savitalote2021@bolgger.com

मराठी साहित्य मराठी लेख दलित साहित्य आंबेडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी साहित्य मराठी लेख दलित साहित्य आंबेडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ एप्रिल, २०२३

baba... ❤❤



1

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार एक क्रांती... 


           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्व अनेक पैलूने व्यापलेले आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. डॉ. आंबेडकर  यांनी सामाजिक राजकीय व आर्थिक न्याय धर्म इतिहास शिक्षण कला साहित्य क्रीडा विविध विषयांवर आपले विचार मांडले आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत होते दलित शोषित पीडितांचे कैवारी होते बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व महान होते.... ते समाज सुधारक होते.... थोर शिक्षक तज्ञ होते.... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. बाबासाहेब यांना ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांनाही तितकेच महत्वाचे आहे. असे त्यांना वाटत होते.


       बाबासाहेब लोकशिक्षक होते. या नात्याने त्यांनी अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडणे त्यांचे विचार हे समता बंधुता स्वातंत्र्य न्याय या न्याय तत्वावर  आधारित होते. भारतीय इतिहासात सर्व समाज सुधारकांनी शिक्षणाला समाज सुधारण्याचे मूळ मानले आहे.

      शिक्षण मन परिवर्तना सोबतच समाज परिवर्तन सुद्धा घडवून आणत असे सर्व समाजसुधारकांना वाटत होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ,"शिका" हा मोलाचा संदेश समाज बांधवांना दिला. कारण संघटित होऊन संघटन शक्ती मजबूत करून संघर्षाकडे जाण्यासाठी लोकांना बाबासाहेबांनी  शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असे वाटत होते.

      आज ते विचार सामाजिक क्रांती बरोबरच शैक्षणिक क्रांती ही तितकीच महत्त्वाची प्रगतीसाठी आहे हे तंतोतंत आज समाजामध्ये दिसून येत आहे .

                भारतीय समाज व्यवस्था चातुर्य वर्णव्यवस्थेच्या इतक आहारी गेला होता की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. बाबासाहेब म्हणतात आपल्यातील माणूस जागा होणार नाही तोपर्यंत आपण संघर्ष करू शकत नाही आणि संघर्ष करण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी एकच मार्ग तो म्हणजे ",शिक्षण."

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शैक्षणिक विचार यासंबंधी मार्गदर्शन करतांना सांगितले की, " विजेचा गोळा (बल्ब) कळ दाबताच जसा अंधार नष्ट करून स्वतःचे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो त्याप्रमाणे शिक्षण होय."

         भारतातील प्रत्येक समाजात शिकलेल्या लोकांनी शिक्षणाचा अवलंब करून पारंपारिक रहाटगाडयात(रूढी प्रथा परंपरा ज्या विकास मार्गामध्ये अडथळे म्हणून काम करतात) हातपाय बांधून ठेवलेल्या भारतीय संस्कृतीचे खरी मुक्तता होणार आहे. असे झाले तरच भारताला उत्कर्षप्राप्तीसाठी वाटचाल करता येईल.

              डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल."  मानवी प्रवृत्ती हे बदलत चाललेला परिस्थितीनुसार बदलत असते तरी पण शिक्षण त्या बदलत्या परिस्थितीतही खूप मोठे योगदान मानवी विचार स्वभावामध्ये योगदान देते. 'बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे असे बाबासाहेब म्हणतात."

          शिक्षणाचे महत्त्व सांगताना बाबासाहेब म्हणतात,"देशातील विषमता नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण होय." विषमता जर नष्ट करायची असेल तर शैक्षणिक क्षेत्र सर्व जाती धर्मासाठी खुले व्हायला हवे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरावर शिक्षण हे मोफत सक्तीचे असावे.

          शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. त्याचा योग्य उपयोग झाला तरच समाजाची प्रगती होईल. त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे जो समाज अशिक्षित असतो तो शिक्षणाअभावी सर्वस्व गमावलेलं असतो शिक्षणाने माणसात कर्तव्य आणि हक्काची जाणीव निर्माण होते. जबाबदारी निर्माण होते. आपल्या शिक्षणापासून वंचित समाजाला शिक्षणाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत कळविणे समजावून सांगताना, डॉ. बाबासाहेब म्हणतात," शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो पाषाण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही."

             शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. त्याला सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय आदी क्षेत्रातील ज्ञान अवगत होते. काय चूक काय बरोबर हे समजून घेण्याची पात्रता निर्माण होते. आपले अधिकार... आपल्या जबाबदाऱ्या या सर्वाची जाणीव शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये निर्माण होते.शिक्षण हे  वाघिणीचे  दुध ...गुरगुरल्याशिवाय राहणार नाही  याची प्रचिती आज आपल्याला समाजामध्ये पावलोपावली दिसून येते.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  वंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या शिक्षण संस्थेचे धोरण जाहीर करताना स्पष्ट केले की," पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे धोरण शिक्षण प्रसार करण्याचे नसून भारतात बौद्धिक  नैतिक आणि सामाजिक लोकशाहीच्या ज्यादारे विकास होईल अशी मनोवृत्ती घडवून आणण्याचे कार्य तिला शिक्षण प्रसाराच्या माध्यमातुन करावयाचे आहे आजच्या भारताला याच गोष्टीची गरज आहे आणि भारताविषयी सदिच्छा बाळगणार्‍या सर्व लोकांनी ही गोष्ट देशात घडवून आणली पाहिजे." शिक्षण म्हणजे फक्त अक्षरओळख नव्हे तर त्यातून सामाजिक आर्थिक नेतिक बौद्धिक लोकशाही आणि इतर गोष्टींचा सुद्धा विकास व्यक्तीमध्ये व्हावा हे शैक्षणिक कार्याचे खऱ्या अर्थाने काम आहे जो या क्षेत्रात आपले योगदान देता है देणार आहे त्यांनी या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना विद्यादान द्यावे शिक्षण संपादन केलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे.

        मुंबईला 20.6.1946 सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला 1950 साली मिलिंद महाविद्यालय सुरु केले. त्यामुळे दलित समाजामध्ये शिक्षणाची क्रांती घडवून आणली. तेवढेच मागासवर्गीयांच्या शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले ते ही आमुलाग्र स्वरूपाची आहे.शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत.    

         शिक्षणामुळे व्यक्ती आणि समाजाची प्रगती होते. शैक्षणिक अधिकार नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्यांचे अस्तित्व नाकारून त्यांच्या क्षमता नष्ट करणे होय. म्हणून बाबासाहेबांची शिक्षण विषयक धोरण मांडतांना म्हणतात,"अस्पृश्यांच्या घराघरात ज्ञान गंगेचा प्रवाह नेणे हा माझा उद्देश आहे."

       शैक्षणिक क्षेत्रात अस्पृश्य आघाडीवर असले तरी काही दिवसात योग्य ती प्रगती करू शकतील असा आत्मविश्वास आहे. आज शिक्षणामुळे सामाजिक स्तर उंचावला सोबत शैक्षणिक अधिकार मिळाल्यामुळे उच्च शिक्षणाचे दारीही उघडे झाले त्या जोरावर आज सामाजिक मागास समजले जाणारे जाति वर्ग उच्च पदावर अधिकारपदावर आपले योग्य प्रकारे योगदान देत आहे.

        भारतीय समाजातील प्रत्येक स्तरावरील विद्यार्थ्यां स्वाभिमानाने शिक्षणाच्या वाटेवर एक एक पाऊल पुढे जात आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचाराचे मूल्य तत्वज्ञान ध्येय धोरण महत्त्व हे प्रत्यक्षात उतरविता आहे. नवा समाज निर्माण करत आहे. अपमानास्पद वागणूक त्यामुळे कमी होत आहे. 

      शिक्षणाची दोर ज्यांनी हातात घेतली. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून येणाऱ्या परिस्थितीवर संकटांवर समस्यांवर मात करीत स्वाभिमानाने यशोगाथा सांगताना दिसतात. आणि हीच यशोगाथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते.

         मिलिंद विद्यालयाच्या शिलान्यास प्रकरणी बोलताना बाबासाहेब म्हणूनच म्हणतात,"हिंदू समाजाच्या अगदी खालच्या स्तरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे मी जाणतो खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते पण हे चूक आहे कारण हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती म्हणजे अन्न वस्त्र निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्चवर्गीयची सेवा करण्यास भाग पाडणे नव्हे. खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यास त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे हे खरे शिक्षणाची ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे."

               भारतीय समाजव्यवस्थेत निसर्ग वादाचे शैक्षणिक प्रारूप कष्टमय पद्धतीने रुजविले. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेत असा कायदा केला. हजारो वर्षाची शैक्षणिक मक्तेदारी मोडून काढत बाबासाहेबांनी शिक्षणावर व्यक्तीची योग्यता ठरते... जातीवर नाही..!! हा विचार त्यांनी भारतीय चातुर्यवर्णीय समाजव्यवस्थेत रुजविला.

       शिक्षणासाठी जात धर्म वय लिंग हे भेदभाव पुसून काढले. शिक्षणाचा हक्क नाकारणे म्हणजे निसर्ग नियमांचे उल्लंघन करणे होय. व्यक्ती विकासाच्या महत्वपूर्ण वैशिष्ट म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीचे नावलौकिक वाढविणे योग्यता वाढविणे हे शिक्षणामुळे सहज साध्य होते.

       डॉ. बाबासाहेब म्हणतात,"आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे." पुस्तक हेच माझे मित्र आहे." असे म्हणतात. 

       तात्पर्य हेच की, पुस्तकासारखा खरा मित्र आयुष्यात व्यक्तीला दुसरा मिळत नाही. अनुभवाची शिदोरी पुस्तकांमुळेे आपल्या आयुष्याला मिळते. काय चांगले काय वाईट यातील भेद कळतो. आयुष्याला मार्गदर्शन करण्याचे काम पुस्तके करतात.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "केवळ बाराखडी शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे." इतके सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता.

        शिक्षण हेच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्वाची बाब आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे.

             20 जुलै 1942 रोजी नागपूर येथील आयोजित डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन प्रगल्भ होता.    

          घरातील स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होते. हा त्या वेळचा दृष्टीकोण आजही शंभर टक्के लागू पडतो.  

              स्त्री पुरुष समानता हे गुण डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारातून प्रकर्षाने जाणवतं तसेच शैक्षणिक विकास करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य हक्क आहे. हे या विचारातून दिसून येते. शिवाय शिक्षणातील विषमता आर्थिक विषमता या विचारातून कमी होऊ शकते.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षणतज्ञ होते. एवढेच नव्हे तर बहिष्कृत हितकारीशी सभा,दलित वर्ग शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा विधायक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार केला.

        भारतीय शिक्षण विषयक स्वातंत्र व अधिकारांचे खरे व खंबीर भक्कम संरक्षण सुद्धा ठरतात. "शिका संघटित व्हा संघर्ष करा"  उद्धाराचा राजमार्गच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांना दिला.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (संदर्भ माझी आत्मकथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक ज गो संत) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. कॉलेजच्या कोनशिला समारंभासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे 1 सप्टेंबर 1951 रोजी औरंगाबादला आले होते त्याप्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे आपल्या संस्थेच्या व स्वतः च्या वतीने स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की," हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणाला किती महत्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे. खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हा विचार होत असताना या वर्गाच्या आर्थिक प्रश्नांचाच विशेष उल्लेख होतो. किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्यांची खरी प्रगती आहे असे मानले जाते. परंतु केवळ तसेच मानले तर ती एक घोडचूक ठरले. भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्तातेच्या मार्गाला आणावयाचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्याल्याची फुकट सोय करून उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे! तर माणसामाणसामधील उच्च नीच व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्त्वज्ञानाने त्यांची वाढच खुंटवून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय! यासाठी खालच्या  थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाज जीवनाने त्यांची कशी फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाच शक्य होणार नाही. म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर शिक्षणप्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे."

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात सर्वोच्च स्थान हे शिक्षणाला दिले शिक्षणामुळे मानवी मेंदू प्रगत होतो. ज्ञानाचा विस्तार होतो. चांगला वाईटाची कल्पना प्रगत होते. शिक्षणामुळे सामाजिक उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी व्यक्ती सामाजिक कर्तव्यांबाबत नेहमी सजग राहतो.

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शैक्षणिक विचार मांडतांना म्हणतात.... 

1.शिक्षणाचा हक्क 

अ.  21 क. राज्य हे सहा वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार शिक्षण (पान 8)

२. विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्र (पान 11 )

28.(1) पूर्णत: राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.

(2) जी शैक्षणिक संस्था राज्याकडून प्रशासली जात असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दान निधी किंवा न्यास याखाली ती स्थापन झालेली असेल तिला खंड(१) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.

(3) राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या पैशातून सहाय्य मिळत असणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत ते काही धार्मिक शिक्षण दिले जाईल, त्यात भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत, जी काही धार्मिक उपासना चालविली जाईल तिला उपस्थित राहण्यास,अशा संस्थेत जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, किंवा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने, आपली संमती दिली असल्याखेरीज अशा व्यक्तीस तसे करणे आवश्यक केले जाणार नाही.

३. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

अ. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण

29.(१) भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्यांच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असेल त्यांना ती जतन करण्याचा हक्क असेल.

(२) राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात,भाषा या किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही.

आ.  अल्पसंख्याक वर्गाच्या शक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क

३०.(१) धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.

१((१क) खंड (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व प्रशासलेल्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य, अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे, त्या खंडा खाली हमी दिलेला अधिकार निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही, अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल.)

(२) शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य, एखादी शैक्षणिक संस्था ही, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्यांक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे, या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. (पान 11)

4. कामाच्या शिक्षणाचा आणि विवक्षित       बाबतीत लोकसहाय्याचा हक्क..

अ. (४१) राज्य हे, आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादीत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणाम कारक तरतूद करील.

5. 16 वर्षाखालील मुलांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद

४५. राज्य हे, बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत, त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील.

6. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक त्यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन

४६. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाति यांचे शैक्षणिक व आर्थिक हे तसं वर्धन विशेष काळजीपूर्वक करील, आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण या पासून त्यांचे रक्षण करील. (पान 18)

7. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानांबाबत विशेष तरतूद

३३७. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने तर,तीच अनुदाने या संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील.

     दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व तीन वर्षांच्या कालावधीतील अनुदानांहून ती दहा टक्क्यांनी कमी असू शकतील.

परंतु या संविधानाच्या प्रारंभापासून दहा वर्षाच्या अखेरीस अशी अनुदाने, जेथवर ती आंग्लभारतीय समाजाला विशेष सवलत म्हणून असतील तेवढ्या व्याप्तीपुरती, बंद होतील.

परंतु आणखी असे की, कोणतीही शिक्षण संस्था, तिच्यात द्यावयाच्या वार्षिक प्रवेशांपैकी कमीत कमी 40 टक्के प्रवेश आंग्लभारतीय समाजाहून अन्य समाजातील व्यक्तींना उपलब्ध केल्याखेरीज, या अनुच्छेदाखाली कोणतेही अनुदान मिळण्याला  हक्कदार होणार नाही. (पान १४३)

8. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून             शिक्षणाच्या सोयी

३५० क. प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशा सोयी पुरवणे शक्य व्हावे, यासाठी राष्ट्रपती आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. (पान 150)

9. आंध्रप्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना

३७१ डः संसदेला आंध्र प्रदेश राज्यात विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करता येईल.

            शिक्षणामुळे बालमनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षणाला प्रथम महत्व दिले आहे. कारण चांगला व्यक्ती घडविण्यासाठी शिक्षण आणि महत्त्वाची भूमिका निभावते.

           शिक्षण त्याग,मानवता, विनम्रता दुसऱ्याची जाणीव नैतिकता अशी मानवी मूल्ये विद्यार्थी मनावर रुजविले जाता. शिक्षण व वैचारिक समतेचा व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा असे बाबासाहेबांना सतत वाटत होते. म्हणून त्यांनी भारतीय संविधानामध्ये प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि क्रांतीचे प्रभावी साधन आहे.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या बदलत्या तांत्रिक काळातही ते अतिशय महत्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. शिक्षणाचे लोकशाही करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही तरीपण शिक्षणाचे लोकशाहीकरण होण्याच्या मार्गावर आहे.  

           डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली शैक्षणिक वाटचाल देशात अजूनही आलेली नाही ती यावी से वाटत असेल तर शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या शासनाच्‍या मानसिकतेमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. कारण समाज सतत बदलत्या भूमिकेत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक महाक्रांती येत आहे आणि या कोरोना महामारी मध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक महाक्रांती झालेली आहे.

       ऑनलाइन शैक्षणिक वर्ग मुळे तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षणाकडे पाहण्याचा उद्देश बदललेला आहे. दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरण राबवताना फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा आता शैक्षणिक बदलताक्रांती कडे लक्ष देऊन राबवावी लागेल. आणि बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होते की बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरणांमध्ये बदल व्हावा कारण शिक्षण समाजपरिवर्तनाचे आणि समाज व्यवस्था सुरळीत चालविण्याची एकमेव साधन आहे....मार्ग आहे !!!

        डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार विश्लेषण करतांना एकच मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे मानवी जीवनाला यशस्वी आणि  प्रतिष्ठापूर्ण  जगण्यासाठी," शिक्षण "हा अविभाज्य घटक असल्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिक्षण विकासाची गुरुकिल्ली आहे... समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे... समाजक्रांतीची  गुरुकिल्ली आहे....  ",शिका संघटित व्हा संघर्ष करा"  आणि समाज परिवर्तनाच्या क्रांती उच्चशिक्षित होऊन आपले योगदान द्या आणि देशाला प्रगतीच्या दिशेने एक पाऊल समोर घेऊन जा..!!


क्रांतीची मशाल आहे शिक्षण 

परिवर्तनाची ढाल आहे शिक्षण  

अन्यायाच्या महाज्योतीत 

ज्योत आहे शिक्षण 

विकासाच्या सर्वोच्च शिखरावर 

मशाल आहे शिक्षण..!!

              आपली परिस्थिती कशी असो शिक्षण हे कधीही सोडू नका. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर भारतामध्ये महाक्रांती घडवून आणली. त्यांचे व्यक्तिमत्व महान आहे.  त्यांचे विचार कधीही समाज बाह्य होणार नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षणामुळे देदीप्यमान इतिहास निर्माण केला हे विसरून चालणार नाही. 

            ✍️🏻सविता तुकाराम लोटे 



आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .





-------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री  कामगार विचार

          भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर एक थोर विचारवंत  शिक्षणतज्ञ , कायदेपंडित , संसदपटू  संपादक ,लेखक ,वकील, प्राध्यापक , समाज सुधारक , घटनाकार ,एक अभ्यासू आमदार  खासदार  अशा  पदांना भूषविलेले व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब ! त्यांच्या या कार्याची दखल सर्वांनीच घेतली.

         १९३६  साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ध्येय धोरणे कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हते तर कष्टकरी समाज वर्गासाठी होते. आर्थिक-सामाजिक राजकीय हक्कांसाठी होते. यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शोषित कामगारा विषयीची तळमळ लक्षात येते. १५ ऑगस्ट 1१९३६ धोरणाचे ध्येय धोरणे अतिशय साध्या पद्धतीने आणि सूक्ष्मसखोल विचार पद्धतीने मांडले.

         कष्टकरी समाज वर्ग सत्ता संपत्ती पासून वंचित होता वाटेल तसे राबविले जात होते त्यामानाने मोबदला मात्र अल्प द्यायचे बारा बलुतेदार पद्धती समाजमान्य होते दलित अस्पृश्यांची स्थिती दयनीय होती शोषित कष्टकरी कामगार वर्ग गुलामीचे जीवनमान जगत होते.            १८७३ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज चळवळीने पारंपारिक समाजात चौकट उद्ध्वस्त केले या चळवळीने समाजातील अस्पृश्यांचे जीवन शैली दाखवून दिले या चळवळीमुळे अस्पृश्य समाज वर्गाला  जीवन जगण्याची  नवीन पद्धत प्राप्त झाली जीवनाला धैर्य प्राप्त करून दिले रोजगार शिक्षण जगण्याचे सामाजिक मूल्य इत्यादी बळ दिले.

             डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या स्वीकारला त्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये  आपला ठसा उमटवलेला आहे १९४२ते १९४६ या काळात केंद्रीय श्रम व रोजगार ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत असताना आपले मत रोख ठोक पद्धतीने मांडले ते म्हणतात," आता काळ बदलला आहे. सत्तेच्या व कायद्याच्या जोरावर कामगार वर्गाला दडपणे शक्य नाही. कामगार हा माणूस आहे. त्यांना मानवाचे हक्क मिळाले पाहिजेत. सध्या सरकार पुढे तीन प्रश्न  आहेत एक तडजोडीचा, कामगाराची निश्चित वेतन , कामगार मालक यांच्यातील सौहादपूर्ण संबंध कामगारांचे राहणीमान उंचावले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. मी नेहमीच कामगार वर्गाच्या बाजूने उभा राहीन.” आपली कार्यपद्धती ही कामगारांच्या बाजूने आहे हे त्यांनी मांडले. 

     २९ मार्च १९४५ स्त्री कामगारांचे स्त्रियांसाठी प्रसूतीचा काळ विश्रांतीची तरतूद, रोख मदत करणे, चार आठवडे प्रसूती भत्ता मिळावा तसेच गैरहजर असताना पगारी सुट्ट्या मिळाव्यात. खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खाण मजुरांसाठी आपले विचार भाषणातून  व कायद्यातून मांडताना दिसतात. स्त्री कामगार अन बद्दलची आत्मीयता त्यांच्या कौटुंबिक समस्या संसार विषयी चिंता त्यांच्या जीवनाचा उन्नतीचा मार्ग हा आर्थिक परिस्थिती सुधारेल तेव्हाच सुकर होईल.  

     बाबासाहेब यांनी १९४५ आली महागाई भत्ता निर्णयामुळे अर्थ मजूर मंत्री असताना बाबासाहेबांचे निर्णय हे कुठल्याही विशिष्ट जातीला समोर न ठेवता समाजातील सर्व जाती धर्मातील कामगारांच्या हितांचे असतील असे निर्णय घेतले स्वातंत्र्य समता बंधुभाव या सूत्रांनी बांधणारी भारतीय राज्यघटना दिली. देश एकसंघ ठेवला.

          ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत असे त्यांचे मत होते. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करणे, मालक आणि कामगार यांच्यात औद्योगिक विवाद झाल्यास दोघात समेट घडवून आणण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे, कामगार आणि मालक यांच्या कोणत्याही वाटाघाटीसाठी तरतूद करणे, वर्षातून किमान 240 दिवस काम, कामगारांना दिवसभरात आठ तास काम, नोकरीत असताना जर  कामगाराचं अपघात व मृत्यू झाला तर मालकांकडून कामगाराला नुकसान भरपाई देणे. असे मत त्यांनी दिल्ली येते जॉईंट लेबर कॉन्फरन्स(Joint Labour Conference 1942) मध्ये कायद्यात एकवाक्यता असावी असे मत व्यक्त केले.  

        त्यांनी स्त्री कामगारांना कायद्यान्वये रात्री काम करण्यासाठी बंदी , स्त्रियांना प्रसुती काळात भर पगारी सुट्टी, बारमाही कामगारांना हक्काची भरपगारी सुट्टी,सक्तीची तडजोड , लवादा हे तत्व कामगारांच्या न्यायासाठी कायमस्वरूपी केले. त्यांचे हक्क वेतन विमा आरोग्य संरक्षण कामाचे तास इ. 

आधुनिक समाजव्यवस्था बदलता आहे. जागतिककरण आले औद्योगीकरण सुरू झाले नवीन वसाहत वादाला शहरी-ग्रामीण भागाचा विकास होत आहे. ग्रामीण भागांचे शहरीकरण होत आहे शहर महानगरात परिवर्तित होत आहे; त्यामुळे सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक यासर्व मध्ये बदल होत आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खूले होत आहे.

       समाज भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार मूलभूत तत्व समानता स्वातंत्र त्यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव आहे. लोकशाही ही आपली जीवनशैली बनवली आहे . बहुराष्ट्रीय कंपनी धोरणामुळे, वाढत चाललेल्या खाजगीकरणामुळे, नवीन समस्या निर्माण होत आहे. नवीन वसाहतवाद निर्माण होतो. साम्राज्यवाद निर्माण होत आहे. सांस्कृतिक दहशतवाद निर्माण होत आहे. माणसाच्या घामाची जागा आता यंत्राने घेतली आहे. श्रीमंत श्रीमंत तर गरीब हा अधिक गरीब होत आहे. सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मूल्यांची घसरण होत आहे. भारतीय कामगार कायदे पुरेसे आहे पण समाधानकारक रीतीने योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे जो कायदा कामगाराच्या फायद्याचा असतो तो निराशाजनक पद्धतीने पदरात पडताना दिसतो .

            सविता तुकाराम लोटे

---------------------------------




माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार..!!



          माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार

                        डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार राजकारणी, तत्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, बहुजनाचे उद्धारकरता, भारताचे भाग्यविधाता, समानतेचा पुरस्कार करणारे होते.  त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माता असे संबोधले जाते. "शिक्षण जितके पुरुषांसाठी आवश्यकता आहे. तितकेच महत्त्वाचे स्त्रियांना सुद्धा आहे ''.  हेे बाबासाहेबांचे विचार आज समाजामध्येेे तंतोतंत जुळत आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात,"ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतिशील असू शकतो."

                   डॉ.  बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे  समर्थक होते. डॉ. बाबासाहेब यांच्या कार्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अतिशय महत्त्वाचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजातील अंधाऱ्या वाटेवर असणाऱ्या स्त्रियांना उजेडात आणले.  त्यांना अक्षर ओळख देऊन प्रगतीचा पहिले किरण त्यांनी दाखविले.  ती आत्मनिर्भर राहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रीला कायदेशीर हक्क मिळवून दिले.  

                त्यांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याची आद्य पुरस्कार होते तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य स्त्रियांसाठी केले ते अलौकिक आहे. समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून ठरविता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आग्रही भूमिका घेतली.

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून तिथे मुलींना सुद्धा प्रवेश दिला.


                डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाजाची प्रगती ही फक्त पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित नसून त्या समाजातील स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असते. समाजाचे मूल्यमापन केवळ पुरुष प्रगतीवर अवलंबून असते. स्त्रियांची देखील होणे गरजेचे असते. याचे भान ठेवणे आवश्यक आहे."

                       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी,"स्त्री एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे आणि तिला स्वातंत्र्य मिळाला हवे".  

                 सर्व क्षेत्रात म्हणून त्यांनी स्त्री वर्गांसाठी भरपूर सुविधा केल्या. जसे मजुरांनी कष्टेकरी स्त्रियांसाठी 21 दिवसाची किरकोळ रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई, कोळसा खाण कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता व रजा मिळावा यासाठी आग्रही भूमिका असणारे पहिले व्यक्ती म्हणजे बाबासाहेब होते.  कामगार पुरुष कामगारांना जितकं वेतन दिल जात तितकेच वेतन स्त्रियांना सुद्धा मिळावे, वीस वर्षाची सेवा संपल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन यासारखे महत्त्वाचे निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी दिले.


                भारतीय जातीव्यवस्था आणि भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीला आळा बसावा यासाठी सतत बाबासाहेबांच्या विचारांमध्ये स्त्री ही अग्रेसर राहिलेली आहे.  कारण स्त्री आणि शूद्र यांच्या वर सतत अन्याय होत राहिला आहे.  हे दोन्ही घटक शोषित आहे. त्यांना स्वातंत्र्य मिळायला हवे, म्हणून जठर विवाह पद्धती, केशवपन पद्धती, बालविवाह पद्धती, सती पद्धती अशा विविध समाजमान्य पद्धती कायद्याने नष्ट व्हाव्या अशी आगरी भूमिका बाबासाहेबांची होती.

        स्त्री पिढ्याने- पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिली. आर्थिक स्वावलंबन संपत्तीवरील समान मालकी हक्क निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रगतीच्या वाटा बंद असलेल्या स्त्रियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्ये कायदामंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल प्रस्ताव लोकसभेत सादर केला.

                     अस्पृश्यतेचे उच्चाटन स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, स्त्री - पुरुष समानता, वारसा हक्क स्त्रियांना देण्याची तरतूद होती. त्यांच्या मध्ये सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधाची पायाभरणी करणे आवश्यक आहे.

                 हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. डॉ. बाबासाहेब म्हणतात ,"हिंदू कोड बिल हा देशातील विधिमंडळाद्वारे घेतलेला सर्वात मोठा सामाजिक सुधारण्याचा निर्णय आहे. असा कायदा जो  याआधी झाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात देखील. येणाऱ्या कुठल्याही कायद्याची त्याची तुलना होणे शक्य नाही.  वर्ग वर्गात असलेली विषमता आणि वर्ग अंतर्गत सुद्धा स्त्री पुरुष असा असणारा लिंगभेद हाच हिंदू समाजाचा आत्मा राहिलेला आहे. हा भेद ही विषमता मिटविल्याशिवाय आर्थिक सुधारणेबाबत कायदे करणे म्हणजे शेणाच्या ढिगार्‍यावर भारतीय संविधानाचा अवाढव्य महाल बांधण्याचा खोटा दिखावा करण्याइतका दांभिक प्रकार आहे."

                डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजापुरते निगडित नसून ती संपूर्ण समाजातील घटकांवर अवलंबून असते. त्यांच्या प्रगतीवर अवलंबून असते.  स्त्री हा त्या समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय हे दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेले आहे.  स्त्री ही आपल्या कुटुंबाचे योग्य पद्धतीने नियोजन करू शकते तसेच स्त्री समाजातही त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले योगदान देऊ शकते.

                 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. कारण भारतीय स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार द्यावा हा त्याकाळी वादग्रस्त मुद्दा होता. कारण एका विशिष्ट समाज व्यवस्थेमध्ये समाज रचना असल्यामुळे समाजातील काही वर्ग प्रगती आणि विकासापासून वेगळी होते आणि हीच गोष्ट त्याकाळी असलेल्या समाज व्यवस्थेला अभिमानाची वाटत असावी. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हक्क सहज समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळावा म्हणून मतदानाचा अधिकार दिला. भारतीय संविधानाने आर्टिकल 326 नुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. तो स्वातंत्र्यपूर्वे आपल्याला नव्हता.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये स्त्रियांच्या प्रगतीला विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली आहे; हे मी मोजतो.''

                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1927 चा महाड चवदारतळ सत्याग्रह, 1930 चा नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 1942 च्या नागपुरातल्या महिला परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  बाबासाहेब म्हणतात ,''मुलींच्या प्रगतीमध्ये लग्न हे अडचणीचे कारण होऊ नये म्हणून मुलांसारखेच मुलींच्याही मताला महत्त्व द्यावे. जेणेकरून लग्नानंतर स्त्रियांना समान अधिकार मिळेल. त्यांच्या आवडीनिवडी त्यांना जपता येईल. पुरुषप्रधान संस्कृतीला कुठेतरी त्या कारणाने आळा बसेल आणि नवीन पिढी नवीन संस्कृतीमध्ये स्वतःला नवीन पद्धतीने समाजापुढे मांडेल.''

                    आजची स्त्री सुशिक्षित आहे. शिक्षित आहे. स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वावलंबी आहे. त्यांचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना जाते तसेच आजची स्त्री स्वतःच्या हक्कासाठी जागरूक आहे तिला तिचे अधिकार माहित आहे. तिला तिचे हक्क माहित आहे. तिला तिच्या जबाबदाऱ्या माहित आहे म्हणून तिला कुठल्याही क्षेत्रात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि योग्य न्याय मागण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर रित्या दिला. डॉ. आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेला स्थान दिले. हिंदू कोड बिल हे सर्वोत्तम उदाहरण आहे. स्त्रीमुक्तीचा ध्यास हा डॉ आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये दिसतो तसेच त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये स्त्री पुरुष समानतेला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. 

                 ती सक्षम आणि साक्षर बनविण्याचे सर्वोत्तम कार्य बाबासाहेबांनी स्त्रियांना दिले. आज स्त्री स्वातंत्र्य विचारसरणीची आहे. ती समाजातील कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण केलेली आहे हे सर्व फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या कायदेशीर रित्या संरक्षणामुळे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व चळवळी समाजातील महिलांच्या नेतृत्वाचा पाय भक्कम करण्यासाठीच होत्या.


             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 - 25 पासून सर्व आंदोलनांमध्ये स्त्रियांना समाविष्ट करून घेतले. यामुळे बाबासाहेबांना कट्टर समाजाकडून विरोध होत होता. महिलांचे प्रश्न, दलित महिलांचे प्रश्न, समाजातील सर्व स्त्रियांचे प्रश्न, दलितांचे अधिकार आणि हक्क, दलित व स्त्रियांना मंदिर प्रवेश यासारखा प्रश्नांवर बाबासाहेबांनी समाजाचे लक्ष वळविले. पण कधीही या प्रश्नांसाठी सनातनी लोकांनी मदत केलेली नाही.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमन्स कॉन्फरन्स मध्ये 25 हजार स्त्रियांना उद्देशून केलेला भाषणात म्हणतात," स्त्रीची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून समाजाची प्रगती मी मोजीत असतो.  म्हणून मला खात्री वाटते व  आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे .कारण त्या सभेला प्रचंड महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता 


        आजही समाजातील काही त्याच विचारसरणीचे लोक मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश महिलांना नाकारतात. हे भारतीय समाजाचे सत्य आहे. कारण बाबासाहेबांनी कायदेशीर रित्या कितीही स्वातंत्र्य स्त्रियांना दिली असले तरी,जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही तोपर्यंत कायद्याची कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.हे भारतीय समाज व्यवस्थेने सिद्ध केलेले आहे. ही एक शोकांतिकाच आहे.

        कारण आजही कायद्यासमोर विशिष्ट विचारसरणीला इतके महत्त्व का दिले जाते. हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्नच आहे.

               स्त्रीला जातिव्यवस्था रूढी, प्रथा, परंपर, संस्कृती या मध्ये अडकविले आणि आजही अडकू पाहत आहे. स्त्री कुटुंबवत्सल आहे. पण आज ती स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीच्या वेदना सोडून आज उच्च पदावर कार्यरत आहे. आज स्त्री पुरुष समानतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. जगाच्या इतिहासात स्त्रियांचे योगदान अमूल्य आहे.

               आधुनिक स्त्रीची वाटचाल सकारात्मक आणि आशादायक आहे. बाबासाहेबांनी लावलेले या रोपट्याला आता फुले- फळे येत आहे. स्त्रीचे योगदान हे कुणीही कानाडोळा करू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी आधुनिक समाजाचे जे चित्र रेखाटले होते ते चित्र आपल्या चारही बाजूने दिसत आहे. आज स्त्री शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, संरक्षण इत्यादी क्षेत्रात सक्षम झालेली आहे. सक्षमीकरणाचा नारा काय असतो हे दाखवून दिले आहे. हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या मिळाले आहे. 

            बाबासाहेबांनी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे न करता त्यांनी स्वतःही रमाबाईंना या चळवळीत येण्यास प्रोत्साहन दिले. रमाबाईंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या कार्यामध्ये योगदान दिले. बाबासाहेब हे केवळ बोलते समाज सुधारक नव्हते तर ते करून दाखविणारे समाज सुधारक होते.  आज स्त्री फक्त पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक न राहता स्वातंत्र्य यशस्वी स्त्री झालेली आहे. याचे सर्व श्रेय बाबासाहेबांना द्यावे लागेल.

          कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो .पण आधुनिक भारताच्या स्त्रियांच्या मागे त्यांच्या प्रगती मागे त्यांच्या आजच्या यशोगाथा मागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.

             बाबासाहेबांनी ज्या सुविधा सामाजिक स्तरावर स्त्रियांना मिळाव्या असे वाटत होते त्या सर्व सुविधा त्यांनी कायदेशीर रित्या भारतीय संविधानात दिला. आज स्त्री काही प्रमाणात असुरक्षित वाटत असली तरी बाबासाहेबांनी दिलेले कायदेशीर हक्क जर तंतोतंत लागू झाले तर समाजामध्ये असलेली विषमता आणि असुरक्षित भावना कमी होईल. 

                 स्त्री समाजामध्ये सुरक्षित राहील.   कारण स्त्री सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहील तर प्रगतीच्या नवनवीन वाटा सर्वांसाठी खुल्या होते. आपण महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, शोषितांच्या वेदनांची जाणीव होऊ द्या स्वातंत्र्य,  समता,   बंधुता ,सामाजिक न्याय या मूल्यांचा उपयोग करा. यावरच आजच्या समाजाची प्रगती आहे आणि उद्याचे भविष्य आहे."

                          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्काप्रती असलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.

भारतीय स्त्रियांना हक्क मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. आज समाजातील सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे. ज्या स्त्रीला फक्त गुलामासारखे आणि उपभोग वस्तू म्हणून वापरले जात होते. ती स्त्री समाजात अर्थ, धर्म ,राज्य, सुरक्षा इत्यादी क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे.  हे सर्व बाबासाहेबांनी त्यांना संविधानात्मक दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या हक्कासाठी म्हणून पूर्णत्वास येत आहे. समाजात मान सन्मान मिळत आहे. स्त्री म्हणजे पायाची दासी नसून विविध क्षेत्रात पुरुषांबरोबर आपलं योगदान देत आहे.

            चूल आणि मूल ही संकल्पनेला आळा देत घराचा उंबरठा ओलांडून जगभरात आपले कर्तव्य गाजवीत आहे आणि हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या वाटेला आलेले आहे.  स्त्रियांना मिळालेली आहे जर बाबासाहेब नसते तर कदाचित हा प्रश्नच अंगाला काटे आणणार आहे.  कारण स्त्री कुठे सुरक्षित असती.

        महिलांना पुरुष समान अधिकार मिळाली नसते तर? 

स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर ?हिंदू कोड बिल मध्ये सुविधा मिळाल्या नसत्या तर??? 

तिला घटस्फोटाचा अधिकार मिळाला नसता तर? 

स्वातंत्र्य विचारसरणीचे अधिकार मिळाले नसते तर? 

रूढी प्रथा परंपरा मान्यच करा असे कायदेशीर गुलामगिरी लादली असती तर? 

        अशी कितीतरी प्रश्न स्त्रियांसमोर असते. पण आज हे प्रश्न स्त्रिया समोर नाही याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. महिलांना नैसर्गिक मानवी हक्क बाबासाहेबांनी मिळून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाज व्यवस्थेला जी गुलाम बंदिस्त परंपरा रूढी प्रथा परंपरा ब्राह्मण संस्कृतीने तेही स्वार्थी यात बंदिस्त होती ती स्वातंत्र्य करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये केले 


     भारतीय विषमतेच्या प्रश्नाला  जसे वर्णव्यवस्था जातिव्यवस्था अवलंबून होते तेच सर्व स्त्रियांसाठी सुद्धा होते. अशा स्त्रियांना मुक्त करण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्यांच्या या कार्याला शब्दात मांडावे इतके शब्दही माझ्याकडे नाही कारण एक स्त्री म्हणून मी आज आशावादी आहे एक स्त्री म्हणून प्रगतीच्या प्रत्येक वाटेवर एक एक पावले चालत आहे. सुरक्षितता हा माझा कायदेशीर अधिकार आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले नैसर्गिक रित्या मी स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले. मी एक स्त्री इतिहासाच्या पुस्तकात गुलाम होती वर्णव्यवस्था जातिव्यवस्थेत  बंदिस्त होती आज मी स्वातंत्र आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले.

        मी मुक्त विचारसरणीने मी आपले मत मांडू शकते हे मला बाबासाहेबांमुळे कळले आणि स्त्री मुक्त सुद्धा आहे हे सुद्धा बाबासाहेबांमुळे कळले. बाबासाहेबांनी लावलेले हे रोपटे आज गोड फळांनी बहरलेले आहे आणि ते फळ खाण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो यातच कुठेतरी समाजव्यवस्था अजूनही वर्णव्यवस्थेतले जात आहे का? हा प्रश्न महिलांना पडत आहे.

     अजूनही आम्ही गुलामच होऊ का? हाही प्रश्न कधी कधी मनात येऊन जातो पण या प्रश्नाचे सर्व उत्तरे नकारात्मक असतात. कारण बाबासाहेबांनी जे कार्य संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी करून ठेवले ते कोणीही नष्ट करू शकत नाही किंवा त्यांचे योगदान कमी लेखू शकत नाही. बाबासाहेब म्हणजे एक स्वातंत्र्य विद्यापीठ आहे. विचारांचे समानतेचे प्रतिष्ठेचे शिक्षणाचे राजकारणाचे अर्थकारणाचे शैक्षणिक करण्याचे आणि जातीय व्यवस्थेचे सुद्धा म्हणून बाबासाहेब माझे गुरु आहे.

        कारण मला जे अधिकार मिळाले एक स्त्री म्हणून ते सर्व फक्त फक्त बाबासाहेबांमुळे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाचे दुःख समजून घेतले नाही तर महिलांचे सुद्धा दुःख त्यांनी समजून घेतले आणि स्त्री नैसर्गिक दृष्ट्या स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे जगापुढे पहिल्यांदा मांडले आणि त्यांच्यासाठी संविधानात्मकरीत्या खूप काही देऊन गेले लिहून गेले आणि समाजात ठेवून गेले.

     डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले चळवळ जगाच्या इतिहासात मानवी मुक्तीचा लढा ठरला आहे. भारतीय समाज व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्याचे काम बाबासाहेबांच्या चळवळीमुळे झाले.

         शिक्षणाचे अखंड ज्योत बाबासाहेबांनी पेटवली. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. आपल्या हक्कासाठी संघर्ष करा कारण समाजात सर्व एकच आहे इथे कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नाही. समता बंधुत्वा न्याय स्वातंत्र्य  संपूर्ण समाजाला दिली.         ...........राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव माझे गुरु माझे मार्गदर्शक मला स्त्री म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य व्यक्तिमत्व स्त्रियांना मानवी हक्क देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा.


              नव्हती आम्हा जगण्याची मुभा नव्हती आम्हा चालण्याची मुभा नव्हती आम्हा शिक्षणाची मुभा बाबासाहेबांमुळे आज सर्वोच्च पदावर जाण्याची मुभा सुरक्षितता प्रदान करण्याची मुभा सुरक्षा देण्याची मुभा शिक्षण घेण्याची मुभा आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा...!!!


आजच्या लेखा संबंधीची माहिती तुम्हाला आवडली असल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका.माझे पेज कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

        तुमची येण्याची जाणीव प्रतिक्रिया असतात. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!❤💕 धन्यवाद!!!!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .



✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे 

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 



❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...