विठ्ठल हे युगे अठ्ठावीस पंढरपूर विटेवर उभे आहे असे म्हटले जाते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आहे. महाराष्ट्राचे एक चिरंतन स्फूर्तिस्थान आहे. गोरगरिबांचा देव म्हणून प्रसिद्ध आहे.
वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ आहे.वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढीवारी. अनेक जाती धर्माचे लोक अतिशय श्रद्धेने वारी करतात. वारी हा एक आनंदाचा सोहळा असतो. श्रद्धेचा सोहळा असतो. वारी आत्म्याचा उत्सव असतो.
डोळ्यातील श्रद्धेला विठ्ठल डोळ्यांचे दर्शन म्हणजे एक अभूतपूर्व अलौकिक,अकल्पनीय आत्मिक आनंदाचा सोहळा असतो.
वारी विठ्ठलाची
वारी पंढरपूरची
वारी परंपरेची
वारी श्रद्धेची
वारी अभंगवाणीची
वारी निसर्गरम्य वातावरणात
स्वतःला हरवून जाण्याची
वारी मुक्तीची
वारी आस्थेची
वारी विटेवर उभा
असलेल्या विठ्ठलाची
वारी आनंद सोहळ्याची
वारी तत्वज्ञानाची
वारी आत्मिक सुखाची
वारी वैश्विकविचार समृद्धीची
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वारकरी संप्रदायाचे खूप महत्त्वाचे योगदान आहे. भक्तिमार्गातून उपेक्षितांच्या प्रश्नांना वाचा देण्याचे स्त्रियांच्या अंतकरणात निर्माण करण्याचे कार्य वारकरी संप्रदाय यांनी केलेले आहे.
महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवण्याचे थोर कार्य वारकरी संप्रदायातील संतांनी केलेली आहे. तत्वज्ञानाची विवेक परवा योग्याची निरामयता संतांचे भूतदया आणि साहित्याची सौंदर्यदृष्टी हे गुण त्यांच्या ठिकाणी एकरूप झालेले आहे.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आपले मत मांडताना म्हणतात,"पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाच्या मुख्य आचारधर्म होय ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे किंबहुना वारकरी नावाच वारी मुळे पडले आहे वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजभिमुखता स्पष्ट होते वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केलेली आहे".
भारतीय परंपरेमध्ये बुद्धिप्रामाण्य बाजूला जाऊन ग्रंथप्रामाण्य मानले जाऊ लागले. कर्मकांड अंधश्रद्धा जातीपातीच्या नावाखाली भेदाभेद या सर्वाचा परिणाम म्हणजे कर्माधिष्ठीत समाज व्यवस्थेऐवजी वर्णव्यवस्था समाजामध्ये वाढीस लागली.
तेराव्या शतकामध्ये वारीची सुरुवात झालेली आहे. संशोधक म्हणतात वारी मध्ययुगातील प्रारंभ काळा सुरुवात झालेली आहे. पायी केल्या जाणार वारीला अतिशय महत्व आहे. ज्ञानेश्वर यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे सामील करून घेतले वारीचे स्वरूप व्यापक केले. संत एकनाथ संत तुकाराम महाराज यांनी संतांनीही ही परंपरा पुढील पिढीपर्यंत आणणे जनसामान्य जनतेपर्यंत महाराष्ट्रव्यापी केली.
वारी या शब्दाचा अर्थ यात्रा नियमित फेरी व्रत येरझारा असा होत. वारकरी संप्रदायाचा आचारधर्मनुसार संप्रदाय अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा वारी करणे आवश्यकता आहे. एक म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस श्री विठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे ही वारकर्यांची मुख्य साधना होय.
आधुनिक तंत्रज्ञान युगातही वारीला अतिशय महत्त्व आहे.ज्ञानेश्वरांनी वारीचे जे रोपटे लावलेले आहे ते आज वटवृक्ष झालेली आहे. परिस्थिती कोणतीही असो वारकरी संप्रदाय वारी करतो. आज जागतिक महामारीच्या काळात वारीला थोडी विश्रांती आहे. पारंपारिक वारीतील नियमांना थोडे बाजूला करून आजही वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेत आहे.
" पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय", हे घोषवाक्य ऐकू येत आहे.
वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेला अतिशय महत्व आहे . गोपीचंदाच्या टिळा कपाळी असतो. वारकरी संप्रदायातील वारकरी नित्यनेमाने हरिपाठ करीत विविध संतांच्या ग्रंथाचे वाचन करीत असतात. अभंग किर्तन भजन अशा विविध स्वरूपात श्री विठ्ठलाचे गुणगान करीत आणि सामाजिक प्रबोधन करीत पंढरपूर वारी करतात.
वारकरी संप्रदायाची दीक्षा म्हणजे 108 मण्यांची तुळशीची माळ घेऊन दीक्षा देणारे प्रमुखाकडे घेऊन जायची ती माळ ज्ञानेश्वरी बरोबर ठेवून प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या कडून घेतो. वर्षातून एकदा तरी वारी केलीच पाहिजे असे वचन घेतो आणि काही नियम आचरणात सांगितले जातात.
१. सत्य बोलावे.
२. परस्त्रीला मातेसमान मानावे.
३. कांदा लसून व मांसाहार करू नये.
४. मद्यपान वर्ज्य करावे.
५. रोज हरिपाठ करावा तसेच रामकृष्णहरी या मंत्राचा जप करावा.
६. प्रपंचातील कर्म श्री विठ्ठल स्मरण करीत पार। पाडावी.
हे सर्व नियम पाळण्याची कबुली करून ज्ञानेश्वरी वर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या गजरात गळ्यात घालतात. वारकरी संप्रदायामध्ये गळ्यात माळ घालने म्हणजे एक नवा अध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते.
पालखी सोहळा
वारकरी संप्रदायाने साधा सरळ डोळस परमार्थ सांगितलेला आहे. गळ्यात तुळशीची माळ घालून हळूहळू सांसारिक सुखातून बाजूला होऊन विठ्ठल भक्तीने एकरूप होतात. पंढरपूरची वारी आणि पालखी सोहळा आपल्या संस्कृतीला एक महत्त्वाचे अंग आहे.
ज्ञानोबा आणि तुकाराम दोघांच्याही पालखी निघत असतात. निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई जनार्दन एकनाथ सावतामाळी रामदास स्वामी या साधूंच्या पालकही दर्शनासाठी पंढरपुरात येतात.
पालखी रथ
पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम खिल्लारी बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात.
पंढरीची वारी व पालखी सोहळा आपले विचार मांडताना ,'विश्वनाथ कराड म्हणतात," आषाढ कार्तिकीच्या वेळी पंढरीच्या वारीला केवळ महाराष्ट्रारातच नव्हे तर इतर अनेक प्रांतातून लाखोच्या संख्येने आलेला हा जो भक्तिरसात डुंबलेला निष्ठावंत श्रद्धाळू वारकर्यचा प्रवाह दिसतो तो पाहिल्यावर मला असे वाटते की खऱ्या अर्थाने सर्व्व जाती-धर्माच्या पुढे जाऊन समाजातील सर्व घटकांनाा यारे यारे लहान थोर ।याती भलते नारी नर।। करावा विचार नलगे ।चिंताा कोणासी।। असेेे आवाहन करणारा मानवधर्मी वारकऱ्यांची ही परंपरा खरोखरच संपूर्ण मानव जातीला कल्याणचा सुख समाधान व शांतीचा मार्ग दाखविणारी आहे".
भजन
वारकरी संप्रदायात वारीतील भजन कीर्तन अतिशय महत्व दिले गेले आहे. टाळविणा पखवाज तबला मृदंग या वाद्यांसह भोजन मोठ्या उत्साहाने केले जाते. भजन म्हणजे आनंदाची पर्वणीच असते.
कीर्तन
कीर्तन समाज प्रबोधन घडवून आणण्याचे वारकरी संप्रदाय मध्ये किर्तनाची सुरुवात झाली. वारकरी कीर्तन हे सांस्कृतिक लोकशाहीची पायाभरणी ठरली."नामदेव कीर्तन करी पुढे देव देवांचे पांडुरंग। जनी म्हणे बोला ज्ञानदेव अभंग।। " संत नामदेवांनी पासून या परंपरेला सुरुवात केलेली आहे.विठ्ठल भक्ती च्या माध्यमातून तळागाळातील समाजाला जागृत करण्याचे काम या माध्यमातून केले जाते.
कीर्तन भजन हे अशी दोन माध्यमे आहे. त्यामुळे मनाचा आत्मविश्वास तर वाढतोच आत्मीयता ही वाढते आणि सोबत पारंपारिक साहित्य कलेचा वापर करून नवीन सामाजिक व्यवस्थेचे प्रश्न समाजापुढे मांडली जाते. त्यातून उत्तर शोधले जातात. पारंपारिक साहित्याचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज दिले जाते.
रिंगण /गोलरिंगण
वारीचे मुख्य केंद्र वारीतील रिंगण असते. रिंगण ही एक पवित्र संकल्पना आहे. कडूस,फाटा,वेळापूर, वाखरीत रिंगण होते. ठरविल्याप्रमाणे मैदानात वारकरी एकमेकांचे हात धरून गोलाकार उभे असतात. यातील मोकळ्या जागेतून माऊलींचा अश्व धावतो .या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात. अशी धारणा वारकरी संप्रदायामध्ये आहे. डोळ्यांचे पारणे फेडले जातात; इतका सुंदर रिंगण सोहळा पूर्ण होतो. रिंगण सोहळ्यानंतर रिंगण मार्गाची माती माथी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते.
रिंगण
अश्व धावतो रिंगणात
भक्त धावतो भक्तीत
पावलांचे ठसे उमटते आत्मशक्ती
खांद्यावर यशाची पताका घेत
युगानुयुगे चालती
पंढरपूरी श्री विठ्ठलभक्त
आपल्याच मग्न धुंदीत
ताल, मृदुंग, टाळ वाजवीत
अभंगवाणी सोबत...
पंढरीचा विठ्ठलसोबत असती
भक्त सख्यासोबती
बाहेरील रिंगणासोबत
अंतरंगी परमात्म्याच्या रिंगणात
विठ्ठलभक्त!!
धावा
वारकरी संप्रदायाचे वारकरी वेळापूर पासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. धावा म्हणजे धावणे असा होतो. संत तुकाराम महाराज पंढरपूरला पायी जात असताना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाचे दर्शन झाले आणि विठ्ठल दर्शनासाठी वेळापूर पासून पंढरपूरपर्यंत धावत गेले. संत तुकाराम महाराज यांचे स्मरण करीत वेळापूरपासून पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.
वारकरी संप्रदायाने परमेश्वराचे अस्तित्व आपल्या घरात माजघरात आणि शेवटी मनाच्या गाभाऱ्यात शोधत असतानाच विश्वव्यापक चराचर सृष्टीचा मंगलमय जीवनाचे तत्वज्ञान सहजपणे सांगून जाते. हे विश्वची माझे घर ही संकल्पना मनामध्ये रुजविली जाते. हा वैश्विक विचार जगापुढे मांडला जातो तोही अगदी साध्या सरळ आणि व्यापक स्वरूपात मानला जातो. वारकरी संप्रदाय भक्ती पंथ आहे. कुठलाही तत्वज्ञानात पांडित्याचा प्रपंच नाही.
भक्तिरसात संत परंपरा अनुभव हेच त्या तत्त्वज्ञानाचे अंतिम प्रमाण आहे. वारकरी संप्रदाय यांनी भक्तीला कुठल्याही रंगरूपात बंदिस्त करून ठेवली नाही. अध्यात्मिक धुरा समर्थपणे खांद्यावरून घेऊन पुढे नेली. महाराष्ट्राची अस्मिता जागृत करण्याचे थोर कार्य वारकरी संप्रदायातील संतांनी केले संत एकनाथ यांनी साहित्यातील लोकशिक्षकाची भूमिका पार पाडली. तर संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून तळागाळातील सामान्य माणसापर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार केला.
संत ज्ञानेश्वर संत नामदेव त्यांच्या पूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता. संशोधकांच्या मते वारकरी संप्रदायाचा उगम भक्त पुंडलिकापासून मानला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांचा कालखंड वारकरी संप्रदायासाठी सुवर्ण काळ होता.
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरांनी वसुधैव कुटुंबकम या भारतीय वेद परंपरेशी जोडणारा ज्ञानेश्वरांनी मंदिराच्या बंदिस्त गाभार्यात नव्हे तर शेताच्या बांधावर बसून द्वैत अद्वैत सिद्धांत कुट तत्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले.
साध्या सरळ सोप्या मराठी भाषेत पारंपारिक शिक्षण जनतेला सांगितला आहे. त्यांचे तत्वज्ञान विचार संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे वाटला आणि मग श्री ज्ञानोबाच्या दिंडीत अवघा समाज एकत्र लोटला. यातून वारकरी संप्रदाय उदयाला आला आणि पुढे नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंत वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान रुजविण्यासाठी योगदान दिले.
ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. चि. ढेरे म्हणतात," संत ज्ञानदेव हे सर्वार्थानी मराठी अस्मितेचे आद्य शिल्पकार आहेत आणि त्याच वेळी ते प्रदेशाच्या भाषांचा जातीच्या-धर्माच्या सीमा सहजपणे ओलांडून जाणारे विश्वात्मभाव उरी वागविणारे महामानव आहेत."
डॉ. रा. चि. ढेरे यांनी ,"मराठी अस्मितेचे आद्य शिल्पकार संत ज्ञानेश्वर असून विश्वाच्या भल्याचे हित जाणणारे ते महामानव आहेत असा संत ज्ञानेश्वरांचा उचित गौरव केला आहे".
संत नामदेव
सगुण भक्तीत रमणाऱ्या व समाजाला
मानवतेची शिकवण देणाऱ्या भाववेड्या संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाब पर्यंत मानाने फडकविली. त्यांची अभंगवाणी म्हणजे त्यांच्या भाव वेड्या उदात्त प्रसन्न निष्पाप सोज्वळ अशा व्यक्तीमत्वाचे आविष्कार होय. संत नामदेवाने विविध जातीपाती गरीब-श्रीमंत भक्तांना पंढरीत एकत्र आणले. आपण सर्व एकच आहोत. असा एक आत्मविश्वास विठ्ठलाच्या भक्तांना दिला.
हे वि इनामदार म्हणतात," नामदेव हे थोर भक्त होते तसेच ते कुशल संघटकही होते वारकरी संप्रदायाच्या संघटनेचे कार्य त्यांनी
ज्ञानेश्वराच्या हयातीत तर केलेच पण ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतरही पन्नास वर्ष महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर नामदेवाने विठ्ठल भक्तीचा ध्वज फडकविला."
नामदेवांच्या अभंगात नाद लय तालाचा अपूर्व संगम आहे.
संत एकनाथ
संत जनाबाई यांनी भागवत मंदिराचे चित्र रेखाटताना जनार्दनी एकनाथ खाब दिला. भागवता असे एकनाथाचे कार्य गौरविले आहे.
संत एकनाथांच्या काळात ,"ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दुर्मिळ झाला होता. त्यांनी संशोधन करून शुद्ध प्रत तयार केली. प्रपंच आणि परमार्थ संस्कृत आणि प्राकृत सुशिक्षित आणि अशिक्षित भक्तिप्रधान सात्विक कविता व शृंगार वीर हास्य प्रधान आख्यान कविता केवळ तत्वज्ञानावर ग्रंथ व सर्व सामान्य जनांच्या भाव-भावना रंगविणाऱ्या लोककथा या सार्यांची सुंदर सांगड संत एकनाथांनी घातली".
संत तुकाराम
तुका झालासे कळस असा तुकोबांचा महिमा संत बहिणाबाईंनी गायिला आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता जागतिक पातळीपर्यंत पोहचलेला आहे. संत तुकाराम यांच्या इतका उंचीचा थोर पुरुष वारकरी संप्रदायात झाला नाही. म्हणून त्यांना कळसाची उपमा दिली जाते.
वैयक्तिक आपत्तीमुळे विरक्त वृत्तीने संत तुकाराम महाराज राहत असे आणि त्यातच त्यांनी संत नामदेव यापासून प्रेरणा घेऊन रचना करण्यास सुरुवात केली. त्यांची अभंगरचना सरळ सोपी रसाळ ओघवती भाषा होती.
अशिक्षित वारकऱ्यांच्या मुखातून ती अव्याहत पणे ओसंडून वाहत असे. त्यांची अपार भक्ती श्री विठ्ठलावर होती. विशाल सागराप्रमाणे त्यांचे अभंग वाणी रचना आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ त्यांचा वारसा संत तुकाराम महाराज यांना मिळालेला आहे.
पंढरीची वारी जनसामान्यांपर्यंत लोकप्रिय करण्याचे काम तुकाराम महाराजांनी केले आहे. तुकोबा नंतर त्यांचे शिष्य निळोबा यांनी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे सांभाळली.
एकनाथ, गोराकुंभार,जनाबाई,चोखामेळा तुकाराम,दामाजी,नरहरी,सोनार,नामदेव निवृत्तीनाथ, बंका,भागू,मुक्ताबाई, राका,कुंभार सखु,सावतामाळी,सोपानदेव, सोयरा, कान्होपात्रा जनाबाई,वेणाबाई आणि आक्काबाई आदी यांनी वारकरी संप्रदायाचा समर्थपणे आपल्या भक्तिमार्गाने समोर नेली.
परतवारी
वारी ही महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. विठ्ठलाचे दर्शन झाले की वारी परतवारी मध्ये रुपांतरीत होते. वारी सगळ्यांनाच माहीत आहे; परतवारी ही खूप लोक खूप कमी लोकांना माहित आहे. कारण वारी करताना एक शिस्तबद्ध पद्धतीने त्यांचे आयोजन केले जाते. उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पावलापावलांवर जागोजागी मिळत असते. सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. मात्र परतवारी मध्ये अतिशय कष्टमय प्रवास असतो. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने जाणाऱ्या वारीला प्रसिद्धीचे झालर आहे; पण
त्याच परतवारीला मात्र लाट ओसरून गेल्यानंतरचे वातावरण मिळते. तरीही भक्तवारी करतात. वारीसोबत विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आणि परतवारी सोबत विठ्ठल दर्शनाने तृप्त झालेला आत्मा समाधान सुखदआनंद दुःखाचे कुठेही गराने न मांडता वारकरी आपला परतवारीचा प्रवास करतो. त्याच उत्साहाने त्याच श्रद्धेने परतवारी चालू होते.
विठ्ठला तुझे दर्शन झाले
थकलेला विठ्ठल भक्त क्षणात
आकाश संचार करीत असतो
विठ्ठल दर्शनाने आणि परत चालू होतो परतीचा प्रवास...
विठ्ठल दर्शनाने जड अंतकरणाने
जडपावलांनी निरोपाचा दिवस
आणि परत एक वचन
गळ्यात तुळशीची माळ
हातात टाळ मृदुंग घेतो
वारी करण्याचे ...
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....
विठ्ठल भक्तीचा प्रसाद म्हणजे प्रेम श्रद्धा आपुलकी आणि आपलेपण होय. विठ्ठल भक्तीची शिदोरी घेऊन वारकरी परतवारीचा प्रवास चालू करतात. वारकरी संप्रदायाला लोकप्रियता मिळाली. त्याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसामान्य जनतेपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचलेलं अध्यात्मिक मार्ग होय. यातूनच समाजामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. प्रेम भक्ती सदाचार नीति श्रद्धा आणि कुठल्याही कर्मकांडाचा वापर न करता फक्त एकच नियम वारकरी संप्रदायाने आपल्यामध्ये निर्माण केला. तो म्हणजे विठ्ठल भक्ती!
वारकरी संप्रदायामध्ये संकुचित विचारसरणीला जागा दिले गेले नाही. त्यांची श्रीमंती फक्त विठ्ठलभक्ती मध्ये आहे. यांचे विचार त्यांच्या भावना श्रद्धा यामधील श्रीमंती आहे.
वारकरी संप्रदायाने एक विशेष महत्व दिले. ती म्हणजे स्थानिक भाषा विठ्ठल भक्ती ही श्रद्धा श्रद्धा आणि श्रद्धा श्रद्धेची बारीक रेषा कुठेही ओलांडली नाही. त्यांनी अंधश्रद्धेला धारा दिले नाही. बौद्ध,जैन,महानुभाव पंथ यांनी ज्याप्रमाणे स्थानिक भाषेला अधिक महत्त्व दिले.त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायांनी दिला.
बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचे केलेले वर्णन वारकरी संप्रदायाचा पारंपारिक इतिहास सुबक शब्दात मांडलेला आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वसामान्यांचा आत्मा आहे. विठ्ठल त्या आत्माचा केंद्रबिंदू आहे. त्या केंद्रबिंदूची शिकवण ही मानवतेवर आधारीत आहे. म्हणून आजही त्याच भक्तिभावाने, त्या जल्लोषाने आणि त्याच श्रद्धेने नियमांचे पालन करीत वारी केली जाते. वारीचे रूप पाहता मनात येऊन जाते... .....वारी आनंदाचा सोहळा...
...वारी आत्म्याचा उत्सव....!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- वारी आनंदाचा सोहळा....
वारी आत्म्याचा उत्सव.....
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका
**************************************************************************