भारतीय समाजव्यवस्थेत निसर्ग वादाचे शैक्षणिक प्रारूप कष्टमय पद्धतीने रुजविले. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे भारतीय राज्यघटनेत असा कायदा केला. हजारो वर्षाची शैक्षणिक मक्तेदारी मोडून काढत बाबासाहेबांनी शिक्षणावर व्यक्तीची योग्यता ठरते... जातीवर नाही..!! हा विचार त्यांनी भारतीय चातुर्यवर्णीय समाजव्यवस्थेत रुजविला.
शिक्षणासाठी जात धर्म वय लिंग हे भेदभाव पुसून काढले. शिक्षणाचा हक्क नाकारणे म्हणजे निसर्ग नियमांचे उल्लंघन करणे होय. व्यक्ती विकासाच्या महत्वपूर्ण वैशिष्ट म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीचे नावलौकिक वाढविणे योग्यता वाढविणे हे शिक्षणामुळे सहज साध्य होते.
डॉ. बाबासाहेब म्हणतात,"आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे." पुस्तक हेच माझे मित्र आहे." असे म्हणतात.
तात्पर्य हेच की, पुस्तकासारखा खरा मित्र आयुष्यात व्यक्तीला दुसरा मिळत नाही. अनुभवाची शिदोरी पुस्तकांमुळेे आपल्या आयुष्याला मिळते. काय चांगले काय वाईट यातील भेद कळतो. आयुष्याला मार्गदर्शन करण्याचे काम पुस्तके करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "केवळ बाराखडी शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे तर मुलांची मने सुसंस्कृत करणारे दर्जेदार शिक्षण शाळांनी दिले पाहिजे." इतके सूक्ष्म विचार बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षणाबाबत केला होता.
शिक्षण हेच खऱ्या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरिता महत्वाची बाब आहे. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे राष्ट्रीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे.
20 जुलै 1942 रोजी नागपूर येथील आयोजित डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजीत असतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन प्रगल्भ होता.
घरातील स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित होते. हा त्या वेळचा दृष्टीकोण आजही शंभर टक्के लागू पडतो.
स्त्री पुरुष समानता हे गुण डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारातून प्रकर्षाने जाणवतं तसेच शैक्षणिक विकास करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य हक्क आहे. हे या विचारातून दिसून येते. शिवाय शिक्षणातील विषमता आर्थिक विषमता या विचारातून कमी होऊ शकते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षणतज्ञ होते. एवढेच नव्हे तर बहिष्कृत हितकारीशी सभा,दलित वर्ग शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी अशा विधायक संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार केला.
भारतीय शिक्षण विषयक स्वातंत्र व अधिकारांचे खरे व खंबीर भक्कम संरक्षण सुद्धा ठरतात. "शिका संघटित व्हा संघर्ष करा" उद्धाराचा राजमार्गच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भारतीयांना दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (संदर्भ माझी आत्मकथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक ज गो संत) पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने औरंगाबाद येथे 1950 साली मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. कॉलेजच्या कोनशिला समारंभासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे 1 सप्टेंबर 1951 रोजी औरंगाबादला आले होते त्याप्रसंगी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचे आपल्या संस्थेच्या व स्वतः च्या वतीने स्वागत केल्यावर डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व कथन करताना सांगितले की," हिंदू समाजातील खालच्या वर्गातून मी आल्यामुळे शिक्षणाला किती महत्व आहे याची मला पूर्ण कल्पना आलेली आहे. खालच्या वर्गातील लोकांना सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, हा विचार होत असताना या वर्गाच्या आर्थिक प्रश्नांचाच विशेष उल्लेख होतो. किंबहुना खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्न सोडविण्यात त्यांची खरी प्रगती आहे असे मानले जाते. परंतु केवळ तसेच मानले तर ती एक घोडचूक ठरले. भारतातील खालच्या वर्गांना उत्कर्षाच्या व मुक्तातेच्या मार्गाला आणावयाचे म्हणजे या देशातील प्राचीन काळाप्रमाणे त्यांची खाण्यापिण्याची व कपड्याल्याची फुकट सोय करून उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी तत्पर ठेवणे हे नव्हे! तर माणसामाणसामधील उच्च नीच व श्रेष्ठ कनिष्ठ भेदभावाच्या ज्या न्यूनगंड तत्त्वज्ञानाने त्यांची वाढच खुंटवून दुसऱ्याचे गुलाम व्हायला त्यांना लावले होते, त्या विषारी परंपरेतून त्यांची सुटका करणे म्हणजेच त्यांचा खरा उद्धार करणे होय! यासाठी खालच्या थरातील लोकांच्या मनात विवेक जागवून व्यक्तिगत व राष्ट्रीय जीवनाचे महत्व पटवून दिले पाहिजे आणि आतापर्यंत ज्या समाजव्यवस्थेत ते जगत होते त्या समाज जीवनाने त्यांची कशी फसवणूक केली आहे हे समजावून दिले पाहिजे. असे कार्य या देशात उच्च शिक्षणाशिवाय केव्हाच शक्य होणार नाही. म्हणून माझ्या मते भारतातील सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर शिक्षणप्रसार हाच एकमेव आणि सर्वश्रेष्ठ तोडगा आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्यात सर्वोच्च स्थान हे शिक्षणाला दिले शिक्षणामुळे मानवी मेंदू प्रगत होतो. ज्ञानाचा विस्तार होतो. चांगला वाईटाची कल्पना प्रगत होते. शिक्षणामुळे सामाजिक उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी व्यक्ती सामाजिक कर्तव्यांबाबत नेहमी सजग राहतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात शैक्षणिक विचार मांडतांना म्हणतात....
1.शिक्षणाचा हक्क
अ. 21 क. राज्य हे सहा वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार शिक्षण (पान 8)
२. विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्र (पान 11 )
28.(1) पूर्णत: राज्याच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.
(2) जी शैक्षणिक संस्था राज्याकडून प्रशासली जात असेल परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दान निधी किंवा न्यास याखाली ती स्थापन झालेली असेल तिला खंड(१) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.
(3) राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या पैशातून सहाय्य मिळत असणार्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत ते काही धार्मिक शिक्षण दिले जाईल, त्यात भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत, जी काही धार्मिक उपासना चालविली जाईल तिला उपस्थित राहण्यास,अशा संस्थेत जाणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, किंवा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने, आपली संमती दिली असल्याखेरीज अशा व्यक्तीस तसे करणे आवश्यक केले जाणार नाही.
३. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
अ. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण
29.(१) भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्यांच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असेल त्यांना ती जतन करण्याचा हक्क असेल.
(२) राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात,भाषा या किंवा यांपैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही.
आ. अल्पसंख्याक वर्गाच्या शक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क
३०.(१) धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल.
१((१क) खंड (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे एखाद्या अल्पसंख्याक वर्गाने स्थापन केलेल्या व प्रशासलेल्या शैक्षणिक संस्थेची कोणतीही मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा कोणताही कायदा करताना राज्य, अशा मालमत्तेच्या संपादनाबद्दल अशा कायद्याने निश्चित केलेल्या किंवा त्याखाली ठरवलेल्या रकमेमुळे, त्या खंडा खाली हमी दिलेला अधिकार निर्बंधित किंवा निराकृत होणार नाही, अशा प्रकारची ती रक्कम आहे याबद्दल खात्री करून घेईल.)
(२) शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य, एखादी शैक्षणिक संस्था ही, धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्यांक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे, या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. (पान 11)
4. कामाच्या शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोकसहाय्याचा हक्क..
अ. (४१) राज्य हे, आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादीत कामाचा, शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहीही अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणाम कारक तरतूद करील.
5. 16 वर्षाखालील मुलांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद
४५. राज्य हे, बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत, त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील.
6. अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक त्यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन
४६. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाति यांचे शैक्षणिक व आर्थिक हे तसं वर्धन विशेष काळजीपूर्वक करील, आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण या पासून त्यांचे रक्षण करील. (पान 18)
7. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरता शैक्षणिक अनुदानांबाबत विशेष तरतूद
३३७. आंग्लभारतीय समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 1948 रोजी संपणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने तर,तीच अनुदाने या संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील.
दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगतपूर्व तीन वर्षांच्या कालावधीतील अनुदानांहून ती दहा टक्क्यांनी कमी असू शकतील.
परंतु या संविधानाच्या प्रारंभापासून दहा वर्षाच्या अखेरीस अशी अनुदाने, जेथवर ती आंग्लभारतीय समाजाला विशेष सवलत म्हणून असतील तेवढ्या व्याप्तीपुरती, बंद होतील.
परंतु आणखी असे की, कोणतीही शिक्षण संस्था, तिच्यात द्यावयाच्या वार्षिक प्रवेशांपैकी कमीत कमी 40 टक्के प्रवेश आंग्लभारतीय समाजाहून अन्य समाजातील व्यक्तींना उपलब्ध केल्याखेरीज, या अनुच्छेदाखाली कोणतेही अनुदान मिळण्याला हक्कदार होणार नाही. (पान १४३)
8. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी
३५० क. प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकारी, भाषिक अल्पसंख्यांक समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या पर्याप्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशा सोयी पुरवणे शक्य व्हावे, यासाठी राष्ट्रपती आवश्यक किंवा योग्य वाटतील असे निदेश कोणत्याही राज्याला देऊ शकेल. (पान 150)
9. आंध्रप्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना
३७१ डः संसदेला आंध्र प्रदेश राज्यात विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कायद्याद्वारे तरतूद करता येईल.
शिक्षणामुळे बालमनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे व्हावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षणाला प्रथम महत्व दिले आहे. कारण चांगला व्यक्ती घडविण्यासाठी शिक्षण आणि महत्त्वाची भूमिका निभावते.
शिक्षण त्याग,मानवता, विनम्रता दुसऱ्याची जाणीव नैतिकता अशी मानवी मूल्ये विद्यार्थी मनावर रुजविले जाता. शिक्षण व वैचारिक समतेचा व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा असे बाबासाहेबांना सतत वाटत होते. म्हणून त्यांनी भारतीय संविधानामध्ये प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि क्रांतीचे प्रभावी साधन आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या बदलत्या तांत्रिक काळातही ते अतिशय महत्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. शिक्षणाचे लोकशाही करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही तरीपण शिक्षणाचे लोकशाहीकरण होण्याच्या मार्गावर आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली शैक्षणिक वाटचाल देशात अजूनही आलेली नाही ती यावी से वाटत असेल तर शैक्षणिक धोरण राबविणाऱ्या शासनाच्या मानसिकतेमध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. कारण समाज सतत बदलत्या भूमिकेत आहे. वाढत्या तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक महाक्रांती येत आहे आणि या कोरोना महामारी मध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक महाक्रांती झालेली आहे.
ऑनलाइन शैक्षणिक वर्ग मुळे तळागाळातील जनतेपर्यंत शिक्षणाकडे पाहण्याचा उद्देश बदललेला आहे. दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे शैक्षणिक धोरण राबवताना फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा आता शैक्षणिक बदलताक्रांती कडे लक्ष देऊन राबवावी लागेल. आणि बाबासाहेबांना हेच अभिप्रेत होते की बदलत्या काळानुसार शैक्षणिक धोरणांमध्ये बदल व्हावा कारण शिक्षण समाजपरिवर्तनाचे आणि समाज व्यवस्था सुरळीत चालविण्याची एकमेव साधन आहे....मार्ग आहे !!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार विश्लेषण करतांना एकच मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे मानवी जीवनाला यशस्वी आणि प्रतिष्ठापूर्ण जगण्यासाठी," शिक्षण "हा अविभाज्य घटक असल्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. शिक्षण विकासाची गुरुकिल्ली आहे... समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली आहे... समाजक्रांतीची गुरुकिल्ली आहे.... ",शिका संघटित व्हा संघर्ष करा" आणि समाज परिवर्तनाच्या क्रांती उच्चशिक्षित होऊन आपले योगदान द्या आणि देशाला प्रगतीच्या दिशेने एक पाऊल समोर घेऊन जा..!!
क्रांतीची मशाल आहे शिक्षण
परिवर्तनाची ढाल आहे शिक्षण
अन्यायाच्या महाज्योतीत
ज्योत आहे शिक्षण
विकासाच्या सर्वोच्च शिखरावर
मशाल आहे शिक्षण..!!
आपली परिस्थिती कशी असो शिक्षण हे कधीही सोडू नका. बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर भारतामध्ये महाक्रांती घडवून आणली. त्यांचे व्यक्तिमत्व महान आहे. त्यांचे विचार कधीही समाज बाह्य होणार नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षणामुळे देदीप्यमान इतिहास निर्माण केला हे विसरून चालणार नाही.
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार एक क्रांती
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
************************************